श्रीगोंद्यात भाजपाची उमेदवारी विक्रमसिंह पाचपुते यांनी घेतली
संजय आ. काटे
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसात अनपेक्षीत धक्कादायक राजकीय घटना घडत आहेत. आज भाजपाने जाहीर केलेली प्रतिभा पाचपुते यांची उमेदवारी ऐनवेळी बदलून त्यांचे पुत्र विक्रमसिंह पाचपुते यांना दिली.
विधानसभा निवडणूकीत दाखल अर्जांच्या माघारीच्या आजच्या शेवटच्या दिवशी दोन महत्वाच्या घडामोडी घडल्या. भाजपाच्या अधिकृत उमेदवार प्रतिभा पाचपुते यांनी अर्ज काढून घेतला. त्यामुळे नियमानूसार त्यांच्या मुलाकडे म्हणजे विक्रमसिंह पाचपुते यांच्याकडे पक्षाची उमेदवारी गेली. पक्षाने आईला पसंती दिली पण आईची पसंती मुलाला होती. ज्यावेळी पहिल्या यादीत भाजपाने प्रतिभा पाचपुते यांचे नाव घोषित केले त्याचदिवशी विक्रमसिंह समर्थक नाराज दिसले. कारण गेली दोन वर्षे विक्रमसिंह हे मतदारसंघाच्या संपर्कात होते. वडील आमदार बबनराव पाचपुते आजारी असल्याने त्यांच्या जागी बदली खेळाडून म्हणून फिल्डींग करणारे विक्रमसिंह भाजपाच्या उमेदवारीचे दावेदाव मानले जात होते. पण त्याचवेळी पक्ष नेतृत्वाने अनपेक्षीतपणे प्रतिभा पाचपुते यांच्या उमेदवारीची घोषणा करीत धक्का दिला होता.
ही उमेदवारी जाहीर करताना महाविकास आघाडीतून शिवसेनेच्या अनुराधा नागवडे असतील हे गृहीत धरले होते. विशेष म्हणजे त्यावेळी नागवडे यांच्यापेक्षा माजी आमदार राहूल जगताप यांचेच पारडे जड होते. पण महाविकास आघाडीपेक्षा भाजपाला नागवडे यांचीची उमेदवारी होईल ही आतली बातमी असल्याने महिलेविरुध्द महिला उमेदवार दिल्याचे बोलले जात होते.
पण राहूल जगताप यांच्या अपक्ष अर्ज भरण्याचा निर्णय व त्यांना मिळणारा तरुणांचा प्रतिसाद यामुळे विक्रमसिंह पाचपुते हवेत ही बाब पुढे आली व त्यातून भाजपातून उमेदवारी बदलाची चर्चा सुरु झाली. भाजपाच्या वरिष्ठांच्या गोटात आमदार बबनराव पाचपुते यांचे गुडविल आहे. त्यातून विक्रमसिंह पाचपुते यांनाही त्याचा फायदा झाला. उमेदवारी बदलण्यापेक्षा प्रतिभा पाचपुते यांनी माघार घेतली तर पक्षाला सोयीचे ठरल्याने असे झाले असल्याचे दिसते.