पाचपुते-नागवडे यांना कुकडीवाले शह देणार का ?
संजय आ. काटे
जवळपास पन्नास वर्षांपासून एक अपवाद वगळता श्रीगोंदा मतदारसंघावर घोड खालील नेत्यांचे वर्चस्व राहिले आहे. मर्यादीत असणाऱ्या घोडच्या पट्याने तालुक्यावर अधिराज्य गाजवले आहे. यंदाही महत्वाच्या दोन पक्षीय आघाड्यांच्या उमेदवारी याच घोड पट्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आता कुकडी पट्ट्यातून बंड होतेय का व त्याला कुकडी खालील मतदार साथ देतात का हे पाहणे महत्वाचे आहे.तसे झाल्यास पुन्हा एकदा घोड विरुध्द कुकडी असा राजकीय संघर्ष पाह्याला मिळेल.
माजी मंत्री राहिलेले विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांनी १९८० पासून प्रत्येकवेळी विधानसभा लढविली. आता त्यांच्या पत्नी डाॅ. प्रतिभा पाचपुते उमेदवारी करीत आहेत. त्यांच्यासोबतच माजी आमदार दिवंगत नेते शिवाजीराव नागवडे यांनीही बहुतेक वेळी पाचपुते यांच्याविरुध्द दंड थोपटले आहे. आता त्यांच्या सुष्ना अनुराधा नागवडे मैदानात उतरत आहेत. या दोन्ही घराण्यांनी गेली पन्नास वर्षे तालुक्याच्या राजकारणावर पकड ठेवली आहे. अपवाद होता २०१४ चा. त्यावेळी राष्ट्रवादीचे राहूल जगताप यांनी पाचपुते यांचा पराभव करीत पहिल्यांदा कुकडीखालील आमदार तालुक्याला लाभला.
घोडखालील झालेले आमदार व वर्षे अशी..
बबनराव पाचपुते – १९८०, १९८५, १९९०, १९९५, २००४, २००९, २०१९
शिवाजीराव नागवडे- १९७८, १९९९
कुकडीखालील आमदार- राहूल जगताप २०१४
या परिस्थितीत १९९५ व २०१९ ला घनशाम शेलार व १९९५ ला बाबासाहेब भोस तर २००९ ला अण्णासाहेब शेलार यांनी नसिब अजनमावले होते. पण त्याना आमदार होता आलेले नाही. आता यंदा पाचपुते विरुध्द नागवडे अशी महायुती विरुध्द महाविकास आघाडी अशी फाईट आहे. कुकडीखालील राहूल जगताप, घनशाम शेलार, अण्णासाहेब शेलार या प्रमुखांची उमेदवारी होवू शकते असे बोलले जाते. त्यातच आता घोडविरुध्द कुकडीचा एकच उमेदवार देण्याच्या हालचालींना बळ आल्याने घोड विरुध्द कुकडी असा संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. यातच श्रीगोंदा व नगर तालुक्यातील जिरायत गावे (साकळाई) यांचा प्रबळ उमेदवार नसल्यास ते कुणाला साथ देणार हाही महत्वाचा प्रश्न आहे.