अनुराधा नागवडे श्रीगोंद्यातून महाविकास आघाडीच्या उमेदवार….
संजय आ.काटे
तुतारी मिळविण्यासाठी मुबंईत तळ ठोकून बसलेले माजी आमदार राहूल जगताप रिकाम्या हाताने परतले. त्याचवेळी काही दिवसांपूर्वीची महायुतीच्या लाडक्या बहिण असणाऱ्या अनुराधा नागवडे यांच्या मनगटावरील घड्याळ जावून तेथे शिवबंधन आले. थेट शरद पवार यांनाच महाविकास आघाडीच्या उमेदवारीत शह देत नागवडेंना उमेदवारी मिळवून देण्यात किंगमेकर ठरलेले शिवसेनेचे उपनेते साजन सदाशिव पाचपुते हे नागवडे कुटुंबासाठी गेमचेंजर ठरले.
श्रीगोंद्याचे राजकारण काय व कसे असते ते पुन्हा एकदा राज्याने अनुभवले. लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्या विजयात श्रीगोंदेकरांनी महत्वाचे योगदान दिले. ३२ हजार मतांची आघाडी त्यांना दिली. यात राहूल जगताप, घनशाम शेलार व साजन पाचपुते यांचा वाटा होता. पण यातील जगताप यांनी शरद पवार व लंके यांच्यासाठी डाॅ. सुजय विखे पाटील यांची मैत्रीही पणाला लावली. श्रीगोंद्यामुळे लंके यांचा विजय झाला हे कुणीही नाकारणार नाही. कारण पारनेर हे लंके याचे होम ग्राऊंड होते तेथे त्यांना अपेक्षीत आघाडी मिळाली. श्रीगोंद्यात विखे यांना डावलून लंके यांची आघाडी ही कुणाची कृपा आहे हे जाणकारांना माहिती आहे.
विशेष म्हणजे डाॅ. सुजय विखे यांच्यासाठी पाचपुते व नागवडे यांनी एकत्रीत खिंड लढवली. तालुक्यातून भलेही विखे मागे राहिले पण आता या दोन्ही कुटुंबांना एकमेकांविरुध्द का होईना पण राज्यात आगामी सत्तेत येणाऱ्या पक्षांची उमेदवारी मिळाली हे राजकारणातील धक्कादायक सत्य आहे. यातच विखे यांच्या प्रचारात असणारे अण्णासाहेब शेलार यांनाही वंचितने उमेदवारी दिली आहे.
तुतारी आपणालाच मिळणार या भ्रमात राहिलेल्या राहूल जगताप यांना खरा शह नागवडे यांनी दिला नाही तर नवख्या साजन पाचपुते यांच्या राजकीय डावपेचात त्यांना धोबीपछाड मिळाला. नागवडे यांना महायुतीत म्हणजे अजित पवार यांच्याकडून उमेदवारी मिळणार नाही हे निश्चित होते. पण तरीही मतदारसंघात घड्याळ घेवून त्या महिनाभर प्रचार करीत राहिल्या. शेवटी साजन पाचपुते यांनी सुत्रे हाती घेतली आणि सगळे चित्रच पालाटले. शिवसेना नेते खासदार संजय राऊत व साजन यांची किती जवळीक आहे याचा प्रत्यय आज पुन्हा आला. ट्रायडंट हाॅटेलवर शरद पवार यांच्यासोबत खासदार लंके, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, जगताप यांची बैठक सुरु असतानाच, इकडे मातोश्रीवर अनुराधा नागवडे यांनी हाती शिवबंधन बांधले आणि थोड्याच वेळात त्यांची हाती शिवसेनेचा एबी फाॅर्म पडलाही.
या घडामोडीत शरद पवार यांनी जगताप यांची बाजू घेत आघाडीची उमेदवारी त्यांना देण्याची तयारी दाखवयाला हवी होती असे कार्यकर्ते म्हणत असले तरी, पवार यांनाही साजन पाचपुते यांनी खासदार राऊत यांच्या माध्यमातून शह दिल्याचे दिसते. आता भाजपाच्या प्रतिभा पाचपुते विरुध्द शिवसेनेच्या अनुराधा नागवडे यांच्यात लढत होत आहे. यात सध्या तरी अण्णासाहेब शेलार आहेत. राहूल जगताप, घनशाम शेलार काय करणार हे गुलदस्त्यात असले तरी, कुकडी कारखान्याची परिस्थिती व मतदारसंघातील संपर्काचा असणाऱ्या अभावाने ते अपक्ष राहतील असे वाटत नाही.
२००४ ची २०२४ ला पुरावृत्ती…..
राष्ट्रवादीची स्थापना झाली त्यावेळी बबनराव पाचपुते यांचा पराभव झाला. त्यानंतर २००४ मध्ये शेवटपर्यंत पाचपुते यांना पक्षाची उमेदवारी राहिल असे सांगितले गेले आणि प्रत्यक्षात शिवाजीराव नागवडे यांना उमेदवारी मिळाली. आताही जगताप यांना शरद पवार यांच्या पक्षाने शेवटपर्यंत उमेदवारी त्यांनाच असे सांगितले आणि उमेदवारी नागवडे यांना गेली. त्यावेळी पाचपुते यांनी अपक्ष उमेदवारी करीत विधानसा जिंकली होती आता जगताप काय करतात हे लवकरच कळेल.
पवारांवर राऊत ठरले भारी…
खासदार संजय राऊत यांनी श्रीगोंद्यात साजन पाचपुते हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असे जाहीर केले होते. त्यानंतर पवार यांनी बारामतीत राहूल जगताप यांना दिलासा देत, कुणीही येईल आणि उमेदवारी जाहीर करेन असे चालते का, तुम्ही कामाला लागा असे सांगून जगताप यांचा रस्ता मोकळा असल्याचे दाखविले होते. पण आता राऊत यांनी त्यांचा शब्द साजन यांच्याच माध्यमातून खरा केला. त्यामुळे श्रीगोंद्यात पवारांवर राऊत भारी ठरले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.