अहिल्यानगर- दौंड महामार्गावरील टोलविरोधात एकजूट
अहिल्यानगर-दौंड महामार्गावर निमगावखलू परिसरातील टोल आज आंदोलनानंतर बंद झाला. स्थानिक वीस किलोमीटर परिसरातील वाहनांना सुट मिळावी यासाठी स्थानिक व्यापारी व तरुणांनी सुरु केलेल्या संघर्षाला आज यश मिळाले. या सुटीबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत टोल बंद ठेवण्याचे ठरले.
काष्टी व्यापारी संघटना व परिसरातील तरुणांनी घेतलेल्या पुढाकारातून या टोलनाक्या विरोधात पुन्हा आंदोलन झाले. काष्टी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष संजय काळे, सांगवीचे युवा कार्यकर्ते ऋषिकेश भोईटे, व गार येथील सामाजीक कार्यकर्ते विनायक मगर यांच्या नेतृत्वाखाली टोल नाका येथे धरणे आंदोलन झाले. यात आसपासच्या गावातील वाहनमालक, व्यापारी सहभागी झाले होते. आंदोलनाची वाढती व्याप्ती पाहून राजकीय नेत्यांचीही आंदोलनात एन्ट्री झाली. आंदोलनात काष्टी सेवा संस्थेचे अध्यक्ष राकेश पाचपुते, आम आदमी पक्षाचे नेते राजेंद्र नागवडे, सामाजीक कार्यकर्ते टिळक भोस यांच्यासह घनशाम शेलार, विक्रमसिंह पाचपुते, डाॅ. प्रणोती जगताप, अनुराधा नागवडे हे नेत्यांसह व्यापारी महेश कटारिया, श्रीकांत पाचपुते, डाॅ. अनिल कोकाटे, संदीप राहिंज, राहूल जंगले, सुनिल जाधव, योगेश कोळसे हे व्यापारी उपस्थितीत होते.
दोन तासापेक्षा जास्त वेळ चाललेल्या आंदोलनात, संजय काळे, ऋषिकेश भोईटे, विनायक मगर यांनी व्यापारी व लोकांच्या वतीने मांडलेल्या भूमिका मांडली. वीस किलोमीटर अंतरावरील वाहनांना या टोलमधून सुट मिळावी ही प्रमुख मागणी होती. ती मान्य होण्यासाठी यात कुठलेही राजकारण येवू नये. शिवाय टोलमध्ये कुणाची भागीदारी आहे याचीही आम्हाला माहिती घेण्याची गरज नाही. महामार्गावरील सुविधा द्याव्यात व स्थानिकांना सुट दिल्यावर हा टोल सुरळीत सुरु ठेवा. पण त्यासाठी अंतीम निर्णय घ्यावा, वारंवार आंदोलनाची वेळ आणू नये अशी भूमिका मांडली.
तहसीलदार क्षितीजा वाघमारे यांनी आंदोलनकर्त्यांची बाजू घेत, ठेकेदार, अधिकारी यांना विविध प्रश्न विचारत निरुत्तर केले. टोल नक्कीच चालवा पण त्याला जे नियम आहेत, स्थानिक लोकांच्या अडचणी आहेत त्या समजून घ्याव्याच लागतील असे सुनावले.
यावेळी चर्चेतून टोल नाका पुढच्या बैठकी पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय झाल्याची माहिती संजय काळे यांनी दिली.
यावेळी पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांनी आंदोलकांची भुमिका समजून घेतली.