नागवडे यांच्या मेळाव्याकडे लक्ष…
संजय आ. काटे
श्रीगोंदा, ता. १९ : आज दिवसभर राज्याच्या राजकारणात श्रीगोंद्याची चर्चा होती. शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुते, राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र नागवडे यांच्या भोवती फिरणाऱ्या राजकीय घडामोडीत शरद पवार गटाचे माजी आमदार राहूल जगताप हेही मुंबईत होते. हाती आलेल्या माहितीनूसार महाविकास आघाडीची जागा शिवसेनेकडे जात असून साजन पाचपुते की अनुराधा नागवडे याचा निर्णय उद्या होणार असल्याची माहिती आहे. दरम्यान राहूल जगताप यांच्या म्हणण्यानूसार ही जागा पवार गटच लढविणार आहे. तथापि नागवडे यांनी उद्या रविवारी दुपारी मेळावा बोलविण्यात आला आहे.
श्रीगोंद्याच्या महाविकास आघाडीच्या जागेवरुन मोठा खल सुरु आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या वादाचे मूळ कारण अजित पवार यांची राष्ट्रवादी ठरली आहे. कारण या पक्षाचे नेते राजेंद्र नागवडे व अनुराधा नागवडे हे आता महाविकास आघाडीकडून उमेदवारीसाठी इच्छूक आहेत. त्यांनी त्यासाठी शरद पवार, बाळासाहेब थोरात, संजय राऊत व उध्दव ठाकरे या सर्वांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. इंदापुरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील आघाडीत आले आणि नागवडे यांच्या बाबत जाणकारांच्या भुवया उंचावल्या गेल्या. त्यातच नागवडे व थोरात यांचे अनेक वर्षांचे संबध असल्याने तेही आघाडीत असल्याचा अप्रत्यक्ष फायदाच नागवडे यांना होतोय.
दिवंगत शिवाजीराव बापु नागवडे यांनी आयुष्यभर काँग्रेस पक्षात राहून राजकीय नेत्यांनी निष्ठा कशी जपावी याचे उत्तम उदाहरण दाखवून दिले आहे. पण त्यांच्या कुटुंबाला ही निष्ठा जपता आली नाही हे दुर्देवाने म्हणावे लागेल. कारण राजेंद्र नागवडे यांनी पहिल्यांदा २००९ ला भाजपात प्रवेश करीत कमळाच्या चिन्हावर विधानसभा लढविली, मात्र त्यात ते पराभुत झाले. त्यानंतर ते पुन्हा काँग्रेसमध्ये आले. नंतर २०१९ मध्ये काँग्रेस सोडून अचानक भाजपात प्रवेश केला. त्यांचे पांरपारिक विरोधक असणारे आमदार बबनराव पाचपुते यांच्या विजयासाठी जीवाची पराकाष्ठा केली. विशेष म्हणजे त्यावेळी नागवडे यांचे नातेवाईक असणारे घनशाम शेलार समोर उभे असतानाही नागवडे यांनी पाचपुते यांच्या विजयात वाटा उचलला. त्यानंतर नागवडे पुन्हा काँग्रेसच्या व्यासपिठावर दिसू लागले. आता काँग्रेस सोडणार नाही असे सांगत असतानाच, लोकसभा निवडणूकीपुर्वी ते अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत डेरेदाखल झाले. ते अजूनही त्याच पक्षात असताना आता महाविकास आघाडीतील पक्ष काँग्रेस, शरद पवार गट शिवसेनेचा ठाकरे गट यांच्याशी बैठकांचे सत्र चालू ठेवले .
आता नागवडे यांनी उद्या कार्यकर्त्यांचा मेळावा बोलाविला आहे. वांगदरी येथे होणारा हा मेळावा कशासाठी आहे हे आता लपून राहिलेले नाही. समजलेल्या माहितीनूसार, शिवसेना उपनेते साजन पाचपुते यांच्या मध्यस्थीने त्यांच्या हाती मशाल येवू शकते. उध्दव ठाकरे व संजय राऊत या नेत्यांशी झालेल्या चर्चेनंतर आघाडीची जागा शिवसेना त्यांच्याकडे घेवून त्या जागेवर नागवडे यांना उमेदवारी देवू शकते असे समजते. मात्र त्याला कुठलाही अधिकृत दुजोरा मिळत नाही. त्यामुळे राजकीय खेळी म्हणून ते अपक्षही लढू शकतात.
जागा आम्हालाच…जगताप
दरम्यान या सगळ्या घडामोडीत राहूल जगताप यांना विचारले असता ते म्हणाले, ही जागा पवार गटाकडेच राहणार आहे. त्यामुळे मी चिंता करीत नाही. पण जर वरिष्ठ पातळीवर काही वेगळे झाले तरी आपण आता थांबणार नाही. कुठल्याही परिस्थितीत निवडणूक लढणारही आणि जिंकणारही. त्यासाठी शरद पवार साहेबांचे विचार सोबत ठेवूनच मार्गक्रमण करु.