जगताप नको म्हणून मुंबईत पुन्हा लागली फिल्डींग
संजय आ. काटे
श्रीगोंदा, ता. १६ : आम्हालाच उमेदवारी द्या ही बाजू रेटण्यापेक्षा राहूल जगताप यांना उमेदवारी देवू नका यासाठी काही नेत्यांनी मुंबईत पुन्हा फिल्डींग लावली आहे. त्यामुळे विरोधकांनी राहूल जगताप यांची धास्ती घेतली आहे का अशी शंका घेतली जावू लागल्याने जगताप यांना त्याचा फायदा होतोय.
२०१४ मध्ये राहूल जगताप हे आमच्यामुळेच आमदार झाले हे राजकीय गणित मांडणारे काही नेते सध्या जगताप यांच्या मागे हात धुवून लागले आहेत. विशेष म्हणजे विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्याविरोधात फारसे कुणी बोलत नसतानाच सगळ्यांचे टार्गेट जगताप झाले आहेत. त्यामुळे मतदारसंघातही जगताप यांचीच चर्चा वाढली आहे, हे त्यांच्या विरोधकांच्या लक्षात येत नाही.
अनुराधा नागवडे यांच्यासाठी गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची तुतारी हाती घेण्यासाठी मोठी यंत्रणा राबत आहे व हे आता लपूनही राहिलेले नाही.
नागवडे कुटुंबाने जशी मध्यंतरी बाळासाहेब थोरात यांच्या हाताची साथ सोडली तशीच आता अजित पवार यांच्या घड्याळाची साथ सोडली आहे. ते सध्या कोणत्याच पक्षात नसल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत. अनुराधा नागवडे यांनी काही दिवस मतदारसंघात गावोगावी जात संपर्क वाढविला. त्यामुळे त्यांची निवडणूक लढणारच ही चर्चा सुरु झाली.
पण गेल्या काही दिवसात अधिकृत उमेदवारीसाठी त्यांच्या प्रमुखांनी टाकलेले डाव उघड झाले आणि त्या अपक्ष लढू शकत नसल्याची नकारात्मक चर्चा पुढे आली.
आता तर जगताप यांच्या विरोधासाठी त्यांची सगळीच टीम राबत असल्याची चर्चा आहे. दक्षिणेतील एका बड्या नेत्यासोबत त्यांच्या कोअर कमिटीने चर्चा केली पण त्यातून काय निष्पण झाले हे अजून गुलदस्त्यात आहे. जगताप यांच्या हाती तुतारी नको यासाठी नागवडे व त्यांचे समर्थक नेते राबत आहेत. त्यासाठी मुंबईत जोरदार फिल्डींग लावली आहे. पण या नेत्यांनी जगताप यांना विरोध दाखवून चूक केल्याची चर्चा आहे. कारण त्यामुळे जगताप यांचीच जास्त चर्चा होत आहे. ज्यांना कुणाला लढाई करायची आहे त्यांनी थेट मैदानात उतरुन लढावे, जगताप यांना थांबविण्यात काहीच अर्थ नाही. तुमचे काम दाखवून मते मिळवा इतरांना विरोध करुन तुम्ही जिंकू शकत नाहीत हे नेत्यांच्या लक्षात येत नाही.