श्रीगोंद्याला आश्वासक बदल हवाय
श्रीगोंदा, ता. १५ भारतीयजनता पक्षाने मला दोन विधानसभा निवडणुकीत थांबवले. पण यावेळी आपण निवडणुकीतून माघार घेणार नाही, असा इशारा भाजप नेत्या सुवर्णा पाचपुते यांनी दिला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना सुवर्णा पाचपुते म्हणाल्या,भाजपाच्या माध्यमातून २० वर्षापूर्वी समाजकारण व राजकारण सुरु केले.
२०१४ व २०१९ मध्ये मी लोकांमध्ये असतानाही विधानसभा निवडणूक लढविण्याची संधी पक्षाने दिली नाही. त्यामुळे यावेळी आपण सर्व पर्याय खुले ठेवून गेल्या अडीच महिन्यात मतदार संघात फिरत आहे. लोकांकडून मिळालेला प्रतिसाद, मूलभूत प्रश्न मार्गी न लागल्याने लोकांचा सत्ताधाऱ्यांवरील रोष आहे. प्रस्थापित आता लोकांना नको आहेत. त्यामुळे आपण केलेल्या कामाच्या जीवावर यावेळी संधी असल्याचे जाणवते.
पाचपुते म्हणाल्या, दोन विधानसभा निवडणूक आपण पक्ष आदेश मानून थांबलो. त्या बदल्यात आपणाला जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवारी देण्याचा शब्द वरिष्ठांनी दिला होता पण तोही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक पाळला नाही.
२०१४ मध्ये भाजप ने कामाला लागा असा आदेश दिला होता, पण पक्षात नव्या नेतृत्वाच्या प्रवेशाने आपली उमेदवारी रद्द झाली. पण तरीही आपण पक्ष वाढीसाठी मी प्रामाणिक काम केले.
विद्यमान आमदार बबनराव पाचपुते यांच्यासाठी प्रचार केला. काष्टी ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांचे पुत्र प्रतापसिंह पाचपुते यांचा प्रचार केला. सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना निवडणुकीत आमदार पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांच्या विजयासाठी कष्ट घेतले.
लोकसभा निवडणुकीत डॉ. सुजय विखे यांचा प्रचार केला, त्यामूळे पक्ष नक्की दखल घेईल लोकांची मागणी काय आहे याचा आदर पक्ष करेल असे वाटते. पक्षाने आपणास उमेदवारी द्यावी कारण भाजप घराणे शाही चा पुरस्कार करणारा पक्ष नाही.
माझ्याकडे कुठल्याही संस्थेचा पैसा नाही, वडील शिवाजीराव नांद्रे हे शेतकरी आहेत. शेतात कष्ट करून त्यांच्या मिळालेल्या पैशात आपला राजकारणाचा खर्च भागविते. आम्ही राजकारणात कोणाच्या प्रलोभनाला बळी पडणार नाहीत, आम्हाला पैशाने कोणी खरेदी करू शकत नाही.
आम्ही कोणाच्या आदेशाने उमेदवारी करत नसून कोणाच्या आदेशाने माघार देखील घेणार नाही असेही सुवर्णा पाचपुते यांनी ठणकावून सांगितले.
सामाजिक बांधिलकी म्हणून आपण दररोज लोकांच्या प्रश्नात असून मतदार संघात कुकडी,घोड आवर्तन, डिंभे ते माणिकडोह बोगदा, साकळाई उपसा जलसिंचन प्रकल्प, उपजिल्हा रुग्णालय, कृषि महाविद्यालय हे प्रश्न राजकीय अनास्थेमुळे सुटू शकले नाहीत. ही या मतदार संघाची शोकांतिका असून हे चित्र बदलण्यासाठी माझी उमेदवारी असून मतदारांनी आज पर्यंत अनेकांना संधी दिली पण प्रश्न जैसे थे राहिल्याने मतदारांनीच मला दौऱ्या दरम्यान या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी उमेदवारी करण्याचा आग्रह धरला आहे. उमेदवारी करणारच याचा पुनरुच्चार करून मतदार संघात कोणत्याही आघाडी चे वातावरण नसून लोकच आता बदलाच्या प्रतीक्षेत आहेत आणि सर्वात कमी खर्चात आपण विजयी होणार असल्याचा विश्वास पाचपुते यांनी व्यक्त केला.