खासदार अमोल कोल्हे यांच्याकडून राहूल जगताप यांच्या पाठीवर थाप
श्रीगोंदा, ता. २७ : राज्यातील अनेक कारखानदार सरकारच्या राजकीय आमिषाला बळी पडले. एनसीडीसीचे कर्ज घेण्यासाठी एक तर शरद पवार यांची साथ सोडली नाही तर सरकारच्या पक्षात सामिल झाले. पण श्रीगोंद्याचा राहूलदादा जगताप या पठ्ठ्याचा आम्हाला अभिमान आहे, त्यांनी सत्तेपुढे मान झुकवली नाही या शब्दात खासदार अमोल कोल्हे यांनी राहूल जगताप यांचे कौतुक करताना त्यांच्या पाठीवर थाप टाकली.
शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने आयोजीत शिवस्वराज्य यात्रा गुरुवारी श्रीगोंद्यात पोचली. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या सभेसाठी मोठी गर्दी होती. अध्यक्षस्थानी नागवडे कारखान्याचे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस होते.
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील, खासदार अमोल कोल्हे, खासदार नीलेश लंके, युवकचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, अतुल लोखंडे, दीपकपाटील भोसले, हरिदास शिर्के, केशवराव मगर,जिजाबापु शिंदे आदी उपस्थितीत होते.
यावेळी खासदार कोल्हे म्हणाले, राज्यातील अनेक कारखान्यांना थकहमी देण्यात आली. कर्ज बसत नसतानाही काही कारखान्यांना ते देण्यात आले. पण कुकडी सहकारी साखर कारखाना, घोडगंगा सहकारी साखर कारखाना यांना मात्र नियमात असतानाही ते नाकारण्यात आले. ज्यांनी फाईल अडवली त्यांनी उत्तर दिले पाहिजे. त्यांना काय हवे होते हे सगळ्यांना माहिती आहे. पण आम्हाला राहूल दादा जगताप यांचा अभिमान आहे. त्यांनी साहेबांची साथ सोडली नाही. सरकारच्या सत्तेपुढे मान झुकवली नाही.
दिवस कसोटीचे असल्याचे सांगत खासदार कोल्हे म्हणाले, आगामी विधानसभा निवडणूकीत ते दाखवून द्यायचे आहे.अनेक प्रलोभने येतील, अनेक मतमंतात्तरे होती, पण शेतकऱ्यांचे भले करणारे, महाराष्ट्राचा स्वाभीमान जपणारे, तरुणांचे हित जोपासणारे सरकार सत्तेत यावे. त्यासाठी शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखालील महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आणा आणि त्यासाठी श्रीगोंद्यातून महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकुन द्या असे आवाहन कोल्हे यांनी केले.
कुकडीचे थकीत ५ तारखेपु्र्वी अदा करणार- राहूल जगताप
जगताप म्हणाले, एनसीडीसीचे कर्ज कुकडी कारखान्याला मिळत होते पण केवळ आम्ही साहेबांसोबत आहोत म्हणून आम्हाला डावलले. पण आम्ही साहेबांची साथ सोडणार नाही. कुकडीची अडचण पवार साहेबांनीच सोडवली असून येत्या ५ आक्टोंबरपर्यंत सगळी थकीत देणी अदा करण्यात येतील. आमच्यावर बुलडोजर जरी फिरवला तरी आम्ही पवार साहेबांना सोडणार नाही. विधानसभेला ५० हजार मतांचे लिड घेवून महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकेल. फक्त नेत्यांना एक विनंती आहे. जे आपल्यासोबत कायम आहेत , लोकसभेला जे सोबत राहिले त्यांनाच सोबत ठेवा. त्याच लोकांचा विचार करावा असे आवाहनही जगताप यांनी केले.