श्रीगोंद्यात बुथ प्रमुखांची आज बैठक…..
संजय आ. काटे
श्रीगोंदे, ता. २२ : महाविकास आघाडीतून माजी आमदार राहूल जगताप यांना झुकते माप देत शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कामाला लागण्याचे आदेश दिले. महायुतीची उमेदवारी आमदार बबनराव पाचपुते यांना मिळते की, राष्ट्रवादीच्या ( अजित पवार गट) अनुराधा नागवडे यांच्या पारड्यात जाते हे अजून निश्चित नाही. पण आता जगताप कामाला लागणार असल्याने नागवडे काय करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. नागवडे यांनी आज श्रीगोंद्यात बुथ प्रमुखांची बैठक बोलावली असून पक्ष नाही तर अपक्ष ही भुमिकाही पुढे येवू शकते असे समजते.
नागवडे व जगताप यांच्यात सध्या राजकीय वैर असले तरी या दोन्ही गटाची नैसर्गिक युती राहिलेली आहे. २०१४ मध्ये दिवंगत नेते शिवाजीराव नागवडे व कुंडलिकराव जगताप यांनी एकत्रीत बसून इतर सहकाऱ्यांच्या मदतीने राहूल जगताप यांची उमेदवारी ठरवली. अर्थात शरद पवार यांनी त्यात महत्वाची भूमिका बजावीत सर्वांना एकत्र केले आणि जगताप आमदार झाले. या घटनेला आता दहा वर्षे झाली आहेत.
२०१९ मध्ये एकसंघ असणाऱ्या राष्ट्रवादी पक्षाचे तत्कालिन जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके हे श्रीगोंद्यातील नेत्यांना उमेदवारीबाबत विचारत होते. तत्कालिन आमदार असलेले राहूल जगताप यांनी निवडणूक लढविण्यास असमर्थता दर्शविली.
त्यानंतर फाळके हे नागवडे यांच्या घरी गेले. तेथे अनुराधा नागवडे यांना उमेदवारी करावी यासाठी गळ घातली पण तत्कालिन काँग्रेस नेते राजेंद्र नागवडे यांनी नकार देत भाजपात प्रवेश केला. त्यावेळी कदाचित नागवडे आमदारही झाले असते. पण घरी आलेली उमेदवारी नाकारली आणि गटही विस्कळीत झाला.
कारण त्यावेळी राष्ट्रवादीची उमेदवारी घनशाम शेलार यांना मिळाली आणि नागवडे यांचे गाव वांगदरी येथून नागवडे ज्यांचा प्रचार करीत होते त्या पाचपुते यांना नव्हे तर शेलार यांना मताधिक्य मिळाले.
आता यावेळी लोकसभा निवडणूकीत नागवडे यांनी पुन्हा पक्ष बदल केला आणि ते अजित पवार यांच्यासोबत गेले. महायुतीत येथे बबनराव पाचपुते हे आमदार आहेत. महायुती त्यांनाच उमेदवारी देणार ही परिस्थितीती असतानाही नागवडे यांनी हा निर्णय घेतला. मध्यंतरी कुठल्याही परिस्थितीत विधानसभा लढणारच ही त्यांनी केलेली घोषणा कृतीत आणावी लागणार आहे.
नागवडे यांचा मोठा व निष्ठावंत कार्यकर्त्यांचा गट आहे. शिवाजीराव नागवडे यांना मानणारा हा वर्ग अनुराधा नागवडे यांची खरी ताकत आहे. या गटाला सोबत घेवून महिलांचे संघटन आणि सामान्यांचा विश्वास संपादन करुन त्यांना निवडणूकीत उतरावे लागणार आहे.
त्यासाठी सर्व पर्याय खुले ठेवून मैदानात उतरल्या तर नागवडे आजही सगळ्यांपुढे आव्हान आहेत. पण त्यासाठी राजकीय मानसिकता व परिपक्वता असणारे लोक त्यांच्या कोअर कमिटीत पाहिजेत व नागवडे यांनीही त्यांचे ऐकले पाहिजे असा मतप्रवाह आहे.
त्यादृष्टीनेच आज त्यांनी श्रीगोंद्यात बुथ कमिटी प्रमुखांची बैठक बोलावली असून त्याकडे लक्ष आहे. अनुराधा नागवडे यांना पक्ष वा अपक्ष यंदा उमेदवारी करावीच लागेल अन्यथा त्यांचा गट संपून जाईन अशी भिती व्यक्त होत असल्याने त्यांना आरपारची लढाई करावीच लागेल.