संजय आ. काटे
श्रीगोंदा, ता. २१ : महाविकास आघाडीत तीन पक्ष आहेत. विधानसभेच्या उमेदवारीबाबत या पक्षांचे प्रदेशाध्यक्ष निर्णय घोषीत करतील. पण श्रीगोंद्याच्या जागेबाबत आपल्यालाच काही शंका आहे काय ? असा सवाल करीत जेष्ठनेते शरद पवार यांनी माजी आमदार राहूल जगताप यांना शंका ठेवू नका कामाला लागा असा थेट आदेश केला. यामुळे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीची जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीलाच राहणार असून येथून राहूल जगताप हेच लढतील असे सुचवित पवार यांनी जगताप यांच्या उमेदवारीला ग्रीन सिग्नल दिला.
आज राहूल जगताप यांचे शेकडो समर्थक शरद पवार यांच्या भेटीसाठी बारामती येथे गेले होते. त्यावेळी पवार यांनी त्यांना आज एवढ्या मोठ्या संख्येने कसे आला असे विचारल्यावर राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के यांनी याबाबतची भुमिका मांडली. शिर्के यांच्या बोलण्यातून श्रीगोंद्यातून महाविकास आघाडीतून कोण लढणार याचा व राहूल जगताप यांच्या उमेदवारीचा संभ्रम असल्याचा आशय आला.
त्यावेळी त्यांच्या हातून माईक घेत शरद पवार म्हणाले, तुम्हाला श्रीगोंद्याच्या जागेबाबत काही शंका आहे का ? काळजी करु नका ती जागा आघाडीत राष्ट्रवादीत लढविणार असून ‘तुम्ही कामाला लागा’ असे थेट सांगितले.
पवार म्हणाले, शिवसेनेचे एक नेते श्रीगोंदा तालुक्यात येवून त्यांच्या पक्षाचे एक उमेदवाराच्या नावाची घोषणा महाविकास आघाडीच्या वतीने केल्याचे समजले. पण ते खरे नाही असे करता येत नाही. ही जागा राष्ट्रवादीचीच असून तेथून आपणच लढणार आहोत.
अहमदनगरमधून सात जागा राष्ट्रवादी लढविणार- पवार
अहमदनगर जिल्ह्यातून श्रीगोंद्यासह पारनेर, कर्जत-जामखेड, नगरशहर, राहूरी, शेवगाव-पाथर्डी, अकोले व कोपरगाव या जागा महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी लढविणार आहे. त्यामुळे आपण कसलीच काळजी करु नका, कामाला लागा.
राहूल जगताप यांच्या गटात उत्साह..
शरद पवार यांनी एकप्रकारे राहूल जगताप यांची उमेदवारीच जाहीर केल्याने त्यांच्या गटात कमालीचा उत्साह आहे. कार्यकर्ते सोशल मिडीयातून त्याबाबतच व्यक्त होत आहेत.