आम आदमी पार्टीचे राजेंद्र नागवडे यांची भूमिका
श्रीगोंदा, ता. १६ : लोकशाहीत सत्तेचे नेहमीच विकेंद्रीकरण व्हावे म्हणजे लोकशाही अजून प्रबळ होईल. त्यासाठी सत्तेची विभागणी महत्वाची आहे. ज्या नेत्यांकडे साखर कारखाने आहेत अशा श्रीगोंद्यातील नेत्यांनी विधानसभा निवडणूकीत थांबून कारखाने चांगले चालवावेत अशी भूमिका ‘आप’चे प्रदेश संघटन राजेंद्र निळकंठ नागवडे यांनी मांडली आहे.
एका व्यक्तीकडे एकच सत्ता केंद्र असल्यास इतरांना संधी मिळतेच आणि त्या व्यक्तीलाही त्या पदाला न्याय देता येतो असे सांगत नागवडे म्हणाले, श्रीगोंद्यात विधानसभा निवडणूक लागण्यापुर्वीच प्रश्न आणि समस्यांची यादीच टाकली जात आहे. सगळेच इच्छूक तालुक्यात आणि मतदारसंघात किती समस्या आहेत व त्या आपणच कशा सोडवू याची आखणी करीत आहेत. आपणाला राजकारण समजायला लागल्यापासून तालुक्यात याच समस्या ऐकतोय. हे असे का घडते याचा विचार सर्वांनी व विशेषकरुन मतदारांनी करायला हवा.
नागवडे म्हणाले, गेल्या चाळीस ते पन्नास वर्षात तालुक्यात विकास झालाच नाही का असेही नसेल पण मूलभूत सार्वजनिक समस्यांकडे नेत्यांनी व विशेषकरुन लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले. त्यातच बहुतेक माजी आमदारांकडे दुसरी मोठी संस्था असल्याने त्यांना इच्छा असूनही आमदारकीला न्याय देता आला नाही व त्याचा फटका सर्वांना भोगावा लागला.
कुकडी, घोड, विसापुरचे असणारे पाणी मिळत नाही, साकळाई उपसा जलसिंचन योजना होत नाही, रस्त्यांना निधी येतो पण त्याचा दर्जा सुमार असतो, सिंचन वाढले पण वीजेचा तुटवडा आहे, औद्योगिकीकरण न झाल्याने बेरोजगारी वाढली, ज्यांच्या ताब्यात मोठ्या संस्था आहेत तेथे लाभार्थींनाच प्रवेश आहे, खाजगी शिक्षण संस्था असणारे जवळच्या लोकांना प्राधान्य देतात अशा एक ना अनेक समस्यांनी मतदारसंघ ग्रासला गेला आहे.
या सगळ्यांचे मूळ एका व्यक्तीकडे अनेक पदे वा संस्था असल्याचे सांगत नागवडे म्हणाले, एक व्यक्ती व एकच पद असे श्रीगोंद्याच्या आमदारांच्या बाबतीत व्हावे. जे कारखानदार आहेत (सहकारी वा खाजगी दोन्हीही) त्यांनी आमदारकी लढू नये, अथवा त्यांनी पहिल्या संस्थेचा राजीनामा द्यावा. त्याशिवाय होणाऱ्या आमदाराला पुर्णवेळ देता येणार नाही.
विधानसभा लढणार का ? या प्रश्नावर राजेंद्र नागवडे म्हणाले, आम्ही पक्षाकडे तशी मागणी केली आहे. पक्षाने आदेश केला तर लढणार आहोतच. जर आमच्या पक्षाच्या विचाराचा आमदार झाला तर तालुक्यातील महत्वाचे प्रश्न आणि समस्या कशा सुटत नाहीत हे आम्ही दाखवून देवू.