पाणीच उपलब्ध होईना, शेतकऱ्यांचे पुन्हा आंदोलन
संजय आ. काटे
(Saklai Upsa Irrigation Scheme News )श्रीगोंदा, ता. २८ : अनेक वर्षे गाजणारी साकळाई उपसा जलसिंचन योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. भाजप सरकारने ही योजना करण्याचे आश्वासन देत, योजनेचे घोड धरणावरुन सर्व्हेक्षणही केले. पण आता योजनेसाठी पाणी उपलब्ध असल्याचे प्रमाणपत्र मिळत नसल्याने योजना पुढे सरकत नाही. याच योजनेसाठी आज शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरले होते.
श्रीगोंदा व नगर तालुक्यातील ३२ गावांसाठी साकळाई योजना महत्वाची आहे. जवळपास तीस वर्षांपासून या योजनेसाठी पाठपुरावा सुरु आहे, पण त्यात यश येत नाही. श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते, नगरचे माजी आमदार शिवाजीराव कर्डीले, तत्कालिन भाजपनेते घनशाम शेलार यांनी सुरुवातीच्या काळात या योजनेसाठी पाठपुरावा केल्याने योजना चर्चेत आली.
दोन तालुक्यातील ३२ गावातील शेतकऱ्यांनी राजकारणी बाजूला सारुन एकत्रीत उठाव केला. नगर, श्रीगोंदा तालुक्यात त्याबाबातचे आंदोलने झाली. राज्य सरकारवर आंदोलनाद्वारे दबाव आल्याने योजनेच्या पाठपुराव्याला गती मिळत गेली.
गेल्या लोकसभा निवडणूकीत भाजपाचे उमेदवार डाॅ. सुजय विखेपाटील यांनी ही योजना झाली नाही तरी आपण पुढची निवडणूक लढणार नाही अशी घोषणा करुन त्याभागातील लोकांच्या अपेक्षा उंचावल्या. दरम्यान त्याचवेळी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही योजना सरकार करणारच असे ठणकावून सांगितल्याने योजना होणार यावर शिक्कामोर्तब झाले. पण योजना कुकडी धरणातून पाणी उपलब्ध नसल्याने होवू शकत नसल्याचे लक्षात आल्याने घोड धरणावरुन योजना करण्याचे ठरले.
साकळाईचे सर्व्हेक्षण सुरु झाले. त्यावेळी पाणी उपलब्ध होवू शकते असे पत्र देण्यात आल्याने आठशे (८००) कोटींचे बजेट असणाऱ्या साकळाईचे सर्व्हेक्षण पुर्ण झाले.
काही महिन्यांपुर्वी लोकसभा निवडणूक झाली. तीत डाॅ. विखे यांचा पराभव झाला व ही योजना होणार की नाही याची भिती वाटू लागली. दरम्यान योजनेसाठी पाणी उपलब्ध आहे असे प्रमाणपत्र कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून लागते ते अजूनही न मिळाल्याने योजनेचे कागद जागीच थांबले आहेत.
याचप्रश्नी आज नगर-दौंड महामार्गावर चिखली (ता. श्रीगोंदा) येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. साकळाई कृती मितीचे समाजसेवक राजाराम भापकर, बाबा महाराज झेंडे, बाजार समिती संचालक रामदास झेंडे, सरपंच कुलदीप कदम, गोरख झेंडे, बाळासाहेब नलगे,सोमनाथ धाडगे,रोहिदास उदमले यांच्यासह अचानक आलेले घनशाम शेलार, अनुराधा नागवडे हे दोन नेतेही सहभागी झाले होते.
आंदोलकांनी पाणीा उपलब्ध असल्याचे प्रमाणपत्र लवकर देवून योजनेचे काम सुरु करण्याची मागणी केली.
——
घोड धरणातून १३ टीएमसी पाणी गेले उजनीला… साकळाईला लागते २ टीएमसी पाणी
ज्या घोड धरणाच्या ओव्हर-फ्लोमधून पाणी योजना करण्यासाठी सर्व्हेक्षण झाले त्याच घोड धरणातून यंदाच्या पावसाळ्यात आत्तापर्यंत तेरा टीएमसी पाणी ओव्हर-फ्लो होवून उजनी धरणाकडे गेले आहे. साकलाई योजनेला दोन टीएमसीच पाणी लागते. योजना असती तर हे पाणी त्याभागातील ३२ गावांना मिळाले असते.