पावसाने हवालदिल लोकांना लंके यांचा आधार
अहमदनगर, ता. २४ : अहमदनगर शहरातील काही भागात अतिवृष्टीने हाहाकार माजवीला आहे.
घरात पाणी शिरले, रस्ते जलमय झाल्याने नागरिक हवालदिल झाले. या नागरिकांना दिलासा व आधार देण्यासाठी खासदार नीलेश लंके धावून आले.
शहरातील नारहरी नगर आणि गुलमोहर रोड येथील नागरिकांना मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय होऊन घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या समस्यांचा सामना करावा लागला.
नागरिकांनी नगरसेवक योगराज गाडे यांना संपर्क करून मदतीची विनंती केली, आणि त्यांनी लगेचच खासदार निलेश लंके यांना याची माहिती दिली.
सिंधी समाजाच्या उत्सवाचा कार्यक्रम संपवून परतताना लंके यांनी तत्काळ आपल्या वाहनाची दिशा बदलून घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांची स्थिती पाहून त्यांनी तात्काळ आपत्ती व्यवस्थापन पथक आणि महापालिकेचे संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून घेऊन सूचना केल्या.
नागरिकांनी वारंवार येणाऱ्या या समस्येचा उल्लेख केला असता खासदार लंके यांनी महापालिकेच्या आयुक्तांना यावर तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश दिले.