shrigonda onion news श्रीगोंदा : तालुक्यातील कांद्याची वाढती लागवड यंदाही कायम राहणार आहे. गेल्यावर्षी तालुक्यातील दोन बाजार समितीत तालुक्यासह आसपासच्या जिल्ह्यातून सव्वापाच लाख क्विंटल कांद्याची आवक झाली. पारगाव येथील चैतन्य बाजार समितीत श्रीगोंदा बाजार समितीच्या तुलनेत जास्त आवक झाली.
श्रीगोंद्यासह आसपासच्या तालुक्यात कांद्याची मोठी लागवड होते. एकट्या श्रीगोंद्यात काही गावांमध्ये कांद्याचेच पिक घेतले जाते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत अनेक गावांमध्ये कांद्याच्या दराबाबत सत्ताधाऱ्यांवर असणारी नाराजी त्यामुळे थेटपणे पुढे आली. पुर्वी तालुक्यात श्रीगोंदे कृषी उत्पन्न बाजार समिती ही एकटीच शेतकऱ्यांची होती. पण आता तीला स्पर्धा खाजगीची झाली आहे. पारगावफाटा येथे चैतन्य या खाजगी बाजार समितीने काही वर्षात कात टाकली आहे. विशेष म्हणजे ती बाजार समिती सुरु झाल्यापासून श्रीगोंदे बाजार समितीत असणारे व्यापारीही तेथे जावून कांदा खरेदी करतात.
दोन्ही ठिकाणावरुन मिळालेले माहितीनूसार, एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या आर्थिक वर्षात श्रीगोंदा बाजार समितीत ७९ हजार ६७१ क्विंटल कांद्याची आवक झाली. त्यातून समितीला आठ लाख ६७ हजाराची बाजार फी मिळाली. त्याच तुलनेत पारगावफाटा येथील बाजार समितीत मात्र चार लाख ३९ हजार ५०० क्विंटल कांदा आवक झाली. अर्थात श्रीगोंद्याच्या तुलनेत बाहेरुन येणारा कांदा तेथे मोठ्या प्रमाणात आला आहे.
श्रीगोंदे बाजार समितीत नव्याने आलेल्या संचालकांचे वर्ष चौकशी, आढावा आणि सचिवाचे निलंबन यातच गेले आहे. त्यामुळे नव्याने त्यांना काही करण्यास वाव मिळाला नाही. तरीही त्यांनी सरकारकडे शेतकरी भवनाचे श्रीगोंदा व काष्टी येथील दोन प्रस्ताव सादर केले आहेत. तीन कोटी १७ लाखांचे हे प्रस्ताव आहेत. ते मंजूर झाल्यास शेतकऱ्यांना हक्काचे भवन मिळेल.