स्वतंत्र भारत पक्षाच्या प्रयत्नांना मोठे यश
श्रीगोंदा, ता. १ : खरीप २०२३ हंगामातील थकीत पीक विमा रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्यासाठी राज्य शासनाने निधीची तरतूद केली आहे. स्वतंत्र भारत पक्षाने केलेला पाठपुरावा व आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे अशी माहिती, स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी पत्रकारांना दिली.
खरीप २०२३ या हंगामात दुष्काळ सदृश्य परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले होते. मात्र दीड वर्ष होऊन गेले तरी विमा कंपनीकडून पीक विम्याचे पैसे मिळत नसल्यामुळे स्वतंत्र भारत पक्ष व शेतकरी संघटनेने अनेक आंदोलने केली. एक ऑगस्ट २०२४ रोजी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा आंदोलन करण्यात आले होते. दिनांक ९ सप्टेंबर रोजी पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालयावर मोर्चा नेला होता. या मोर्चात, पैसे न मिळाल्यास राजकीय पुढाऱ्यांना गावातील सभेत “जाब विचारण्याचे” आंदोलन जाहीर केले होते. त्याचा परिणाम झाला व दिनांक ३० सप्टेंबर २०२४ रोजी राज्य शासनाने, शासन निर्णय करून फक्त ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीची थकबाकी अदा करण्यासाठी १९२७.५२ कोटी रुपयाची आर्थिक तरतूद केली आहे.
कृषी आयुक्त कार्यालयाला सदरची रक्कम त्वरित वितरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सदरची रक्कम लेखा परीक्षा विभागाकडे, अग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनीद्वारे ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडून वर्ग करण्यात येईल. या निर्णयाचा फायदा नाशिक, नगर, सातारा, सोलापूर, चंद्रपूर, व जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. आठ ते दहा दिवसात विम्याची थकीत रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल अशी माहिती ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे विभागीय प्रबंधक दीक्षित यांनी घनवट यांना दिली.
थकीत विमा रक्कम मिळणार असल्याची खात्री झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अहमदनगर जिल्हा स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष नीलेश शेडगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले असून स्वतंत्र भारत पक्ष व शेतकरी संघटनेच्या नेत्यांचे आभार मानले जात आहेत.